फार्मसी क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावशाली करिअर म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक).
ड्रग इन्स्पेक्टर हे राज्य सरकार, केंद्रीय सरकार, आणि CDSCO (Central Drugs Standard Control Organization) अंतर्गत कार्यरत असतात. ते औषध उत्पादन, वितरण, आणि विक्री यावर नजर ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात. त्यांची मुख्य जबाबदारी औषध आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940आणि इतर संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे ही असते.
ड्रग इन्स्पेक्टरच्या मुख्य जबाबदाऱ्या
• औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करून उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण
करणे.
• औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवणे.
• औषध विक्रेत्यांची तपासणी करणे आणि त्यांच्याकडून आवश्यक परवाने तपासणे.
• नकली आणि कमी दर्जाच्या औषधांची तस्करी आणि वितरण रोखणे.
• औषधांच्या दुष्परिणामांशी संबंधित तक्रारींची तपासणी करणे.
• अवैध औषध व्यापार आणि इतर अपराधांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करणे.
• न्यायालयीन प्रकरणांमध्ये साक्ष देणे.
• जनतेला औषधांच्या सुरक्षित वापराबद्दल मार्गदर्शन करणे.
• नवीन औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या अनुज्ञा (approval) प्रक्रियेत सहभाग
घेणे.
ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी आवश्यक पात्रता
1. शैक्षणिक पात्रता:
o मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदवी (B.Pharm) पूर्ण केलेली
असणे आवश्यक आहे.
2. स्पर्धा परीक्षा:
o संबंधित राज्य सरकारच्या सार्वजनिक सेवा आयोगाद्वारे (उदा. महाराष्ट्रासाठी
MPSC) किंवा UPSC (संघ लोक सेवा आयोग) द्वारे आयोजित परीक्षा उत्तीर्ण
करणे आवश्यक असते.
o या परीक्षेत फार्मसी विषयातील सखोल ज्ञान, सामान्य ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन,
तर्कशक्ती, आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जाते.
o या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढे व्यक्तिगत मुलाखत घेतली जाऊ
शकते.
3. अनुभव:
o काही प्रकरणांमध्ये औषध उत्पादन किंवा गुणवत्ताविषयक निरीक्षण क्षेत्रातील
अनुभव आवश्यक असू शकतो.
4. इतर पात्रता:
o उमेदवारांचे वय आणि आरोग्य याबाबत सरकारच्या नियमांनुसार निकष असतात.
परीक्षेची तयारी कशी करावी?
या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना कठोर परिश्रम करावे लागतात. या परीक्षेची तयारी बी.फार्मच्या पहिल्या वर्षापासूनच सुरू करणे आवश्यक आहे.
ड्रग इन्स्पेक्टर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी फार्मसी अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या तसेच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर लक्ष असू द्या.
ड्रग इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) होण्याचे फायदे:
• ड्रग इन्स्पेक्टर हे समाजात अतिशय प्रतिष्ठेचे पद मानले जाते.
• ड्रग इन्स्पेक्टर नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण औषधे मिळतील याची
खात्री करतात.
• औषध निरीक्षक म्हणून काही वर्ष सेवा केल्यानंतर पदोन्नतीने सहायक आयुक्त ते
सहआयुक्त या पदापर्यंत संधी मिळते..
• ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी चांगला पगार आणि भत्ते मिळतात.
ड्रग इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) ही फार्मसीमधील एक अतिशय आकर्षक आणि जबाबदारीची कारकीर्द आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कठोर मेहनत आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन आणि तयारीने तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.
तुमच्या यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा !
प्रा. प्रवीण जावळे
लेखकाचा परिचय
प्रा. प्रवीण जावळे (एम. फार्म.), २००४ पासून पुणे येथील भारती विद्यापीठाच्या फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम करत आहेत. त्यांना २० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे.
ते पुण्यातील फार्मालाइफ अकादमीचे सल्लागार मंडळ सदस्य आहेत, एफआयपी, एपीटीआय आणि विश्व साहित्य परिषद आणि फार्मसी माजी विद्यार्थी संघटनेचे आजीवन सदस्य आहेत.
अधिक माहितीसाठी, तुम्ही त्यांच्याशी pravin_jawale@rediffmail.com वर संपर्क साधू शकता.
पुस्तकांचे सह-लेखक:
1. Essential Pharmacy Review For Drugs Inspector Exams, Nirali Prakashan, Pune
2. Pharmacist Recruitment Exam, Nirali Prakashan, Pune
3. Diploma in Pharmacy Exit Examination (DPEE), Nirali Prakashan, Pune
4. Pharmacology (Second Year SY Diploma Pharm. PCI – ER 2020), Nirali Prakashan, Pune
5. Pharmaceutics (First Year Diploma in Pharmacy PCI ER 2020 Syllabus), Nirali Prakashan, Pune